#विधान_परिषद_निवडणूक #नांदेड_प्रशासन #आचारसंहिता_कडक #नोडल_अधिकारी_बैठक #सत्यमेव_जयते
राजेश्वर पोतदार, नांदेड/नायगांव
नांदेड/नायगांव (विशेष प्रतिनिधी): ०२ जून २०२६
महाराष्ट्र विधान परिषदेच्या नांदेड स्थानिक प्राधिकार मतदारसंघाच्या द्वैवार्षिक निवडणूक प्रक्रियेची घोषणा झाली असून, ही संपूर्ण प्रक्रिया अत्यंत पारदर्शक, निष्पक्ष आणि शांततेत पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे ॲक्शन मोडमध्ये आले आहे. या निवडणुकीच्या नियोजनासाठी सर्व नोडल अधिकारी आणि सहाय्यक अधिकारी यांनी त्यांना नेमून दिलेली कामे व जबाबदाऱ्या वेळेत आणि चोखपणे पार पाडाव्यात, असे स्पष्ट निर्देश अपर जिल्हाधिकारी रत्नदीप गायकवाड यांनी दिले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्य बैठक कक्षात आज सर्व विभाग प्रमुखांची आणि निवडणूक नोडल अधिकाऱ्यांची अत्यंत महत्त्वाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती, याप्रसंगी ते मार्गदर्शन करत होते.
🔹 वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती:
या महत्त्वाच्या बैठकीला उपजिल्हाधिकारी (सामान्य) अजय शिंदे, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) राजकुमार माने, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, उपजिल्हाधिकारी (रोहयो) हनुमंत कोळेकर, उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांच्यासह जिल्ह्यातील विविध शासकीय विभागांचे प्रमुख व नोडल अधिकारी उपस्थित होते.
🔹 व्हिडिओ कॅमेरासह FST पथके तैनात होणार:
बैठकीदरम्यान निवासी उपजिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी किरण अंबेकर यांनी निवडणूक आचारसंहितेच्या कडक अंमलबजावणीबाबत सर्व अधिकाऱ्यांना विस्तृत सूचना दिल्या. निवडणुकीच्या काळात कुठेही गैरप्रकार किंवा प्रलोभन दाखवले जाऊ नये, यासाठी जिल्ह्यात तातडीने व्हिडिओ कॅमेऱ्यासह एफएसटी (Flying Squad Teams - उडते पथक) पथके स्थापन करण्यात यावीत, असे त्यांनी सांगितले. संपूर्ण नांदेड जिल्ह्यात आचारसंहितेचा कुठेही भंग होणार नाही, याची सर्वोच्च दक्षता प्रत्येक विभाग प्रमुखाने घ्यावी, अशी तंबीही त्यांनी दिली.
🔹 मतदान आणि मतमोजणीचे चोख नियोजन:
या बैठकीत स्थानिक प्राधिकार मतदारसंघाच्या मतदानाची तारीख, मतमोजणीची व्यवस्था, संवेदनशील मतदान केंद्रांची सुरक्षा, अधिकारी-कर्मचाऱ्यांचे निवडणूक प्रशिक्षण आणि मतमोजणीच्या अनुषंगाने करावयाच्या तयारीसह विविध तांत्रिक व अनुषंगिक बाबींवर सविस्तर चर्चा करून सूक्ष्म नियोजन करण्यात आले.
निर्भीड, निष्पक्ष आणि वेगवान बातम्यांसाठी पाहत राहा - 'सत्यमेव जयते No 1 NEWS'




कोणत्याही टिप्पण्या नाहीत: