राजेश्वर पोतदार,
नांदेड (विशेष प्रतिनिधी): ०६ जून २०२६
शासन सेवेत कार्यरत असलेल्या आणि सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित सेवाविषयक अडचणी तातडीने, पारदर्शकतेने आणि कार्यक्षमतेने सोडवण्यासाठी एक अत्यंत कौतुकास्पद पाऊल उचलण्यात आले आहे. विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांच्या संकल्पनेतून संपूर्ण विभागात प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी 'कर्मचारी समाधान शिबीर' आयोजित करण्यात येणार आहे. या अनुषंगाने नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कक्षात सर्व विभाग प्रमुखांची एक अत्यंत महत्त्वाची बैठक संपन्न झाली.
या बैठकीत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सर्व शासकीय विभागांच्या प्रमुखांना कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक अर्जांची माहिती, कर्मचारी समाधान शिबीर विवरणपत्र 'अ' आणि 'ब' मध्ये तात्काळ भरून सादर करण्याचे कडक निर्देश दिले आहेत. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख व प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
🔍 कसे असणार शिबिराचे त्रिसुत्री नियोजन?
कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी हे शिबीर एकाच वेळी तीन वेगवेगळ्या पातळ्यांवर आयोजित केले जाईल:
१. तालुका स्तर: तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली हे शिबीर थेट तहसील कार्यालयात पार पडेल.
२. जिल्हा स्तर: जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा स्तरावरील अडचणींसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात शिबीर होईल.
३. विभागीय स्तर: विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय पातळीवरील अडचणींसाठी आयुक्त कार्यालयात शिबिराचे आयोजन केले जाईल.
या शिबिरांमध्ये संबंधित अर्जदार अधिकारी, कर्मचारी तसेच विविध कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी प्रत्यक्ष उपस्थित राहून आपल्या रास्त समस्या मांडू शकणार आहेत.
🔹 हेलपाट्यांपासून मिळणार कायमची मुक्ती:
अनेकदा कर्मचाऱ्यांना हक्काचे वेतन, पदोन्नती (Promotion), रजा मंजुरी, निवृत्तीवेतन (Pension) किंवा सेवापुस्तिका (Service Book) अद्यावत करणे यांसारख्या वैयक्तिक कामांसाठी प्रशासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागतात आणि हेलपाटे मारावे लागतात. हीच गंभीर बाब लक्षात घेऊन प्रशासनाने हा मोठा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, जर महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी शासकीय सुट्टी आली, तर त्यापूर्वीच्या कामकाजाच्या दिवशी हे शिबीर अनिवार्यपणे घेतले जाईल. सर्व कार्यालयांना आपापल्या प्रभागातील प्रलंबित प्रकरणांची यादी अद्यावत ठेवून ती शिबिरात समाविष्ट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
📢 दिरंगाई करणाऱ्यांवर होणार थेट कारवाई!
"या विशेष मोहिमेमुळे शासकीय कर्मचाऱ्यांच्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या तक्रारींचे निवारण होईल आणि प्रशासकीय कामात मोठी गती येईल. सर्व संबंधित विभाग प्रमुखांना या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश देण्यात आले असून, कामात दिरंगाई किंवा टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांवर थेट जबाबदारी निश्चित करून कडक कारवाई केली जाईल," अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांनी दिली.
निर्भीड, निष्पक्ष आणि वेगवान बातम्यांसाठी पाहत राहा - 'सत्यमेव जयते No 1 NEWS'
(रिपोर्ट: राजेश्वर पोतदार, नांदेड)




कोणत्याही टिप्पण्या नाहीत: