राजेश्वर पोतदार, नायगांव
नायगांव/नांदेड (विशेष प्रतिनिधी): १७ जून २०२६ राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील महिला बचत गटांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी आणि त्यांच्यासाठी मोठ्या प्रमाणावर स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती करण्यासाठी राज्य सरकारने एक अत्यंत ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष निर्देशानुसार राज्यातील महिला बचत गटांना व महिलांच्या को-ऑपरेटिव्ह संस्थांना व्यवसाय सुरू करण्यासाठी महसूल विभागाकडून प्रत्येक बचत गटाला एक हेक्टर (तब्बल अडीच एकर) सरकारी जमीन पाच वर्षांच्या लीजवर (भाडेतत्वावर) देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अत्यंत महत्त्वाकांक्षी योजनेची अधिकृत घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.
विशेष म्हणजे, हे प्रकल्प सुरू करण्यासाठी महिला बचत गटांना जिल्हा नियोजन समिती (DPC) किंवा स्थानिक खनिकर्म निधीतून १ लाख रुपयांचे थेट आर्थिक अनुदानही शासनाकडून दिले जाणार आहे.
वार्षिक ४ ते ५ लाखांचे हक्काचे उत्पन्न: या महत्त्वाच्या निर्णयाची माहिती देताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, "महिला बचत गटांना सुपूर्द करण्यात आलेल्या या एक हेक्टर जागेमध्ये महिलांनी 'ग्रासलँड डेव्हलपमेंट' (गवत व चारा विकास प्रकल्प) उभा करायचा आहे. यामध्ये प्रामुख्याने जनावरांसाठी लागणारा दर्जेदार चारा, बांबू लागवड किंवा नेपियर गवत (Napier Grass) लावायचे आहे. आज जर एखाद्या बचत गटाला आम्ही अडीच एकर जागा दिली, तर त्यातून सर्व खर्च वजा जाता वार्षिक ४ ते ५ लाख रुपयांचे हमखास उत्पन्न महिलांना मिळेल."
सरकार कोणताही हिस्सा घेणार नाही! महसूलमंत्र्यांनी स्पष्ट केले की, या चाऱ्यामधून किंवा इतर उत्पादनातून जो काही पैसा आणि नफा मिळेल, तो संपूर्ण पैसा थेट संबंधित महिला बचत गटालाच मिळेल. सरकार या उत्पन्नातून एक रुपयाचाही हिस्सा घेणार नाही. एका बचत गटाच्या माध्यमातून किमान १० महिलांना कायमस्वरूपी रोजगारनिर्मिती करून देण्याचा महसूल खात्याचा हा एक अत्यंत मोठा आणि दिशादर्शक प्रकल्प ठरणार आहे.
नांदेड आणि नायगांव तालुक्यातील बचत गटांना मोठी संधी:
या निर्णयामुळे नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगांव तालुक्यातील शेकडो नोंदणीकृत महिला बचत गटांना हक्काची जमीन उपलब्ध होणार आहे. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असलेल्या शासकीय गायरान किंवा पडीक जमिनी आता महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाचे मुख्य केंद्र बनणार आहेत.
निर्भीड, निष्पक्ष आणि वेगवान बातम्यांसाठी पाहत राहा - 'सत्यमेव जयते No 1 NEWS' (रिपोर्ट: )





कोणत्याही टिप्पण्या नाहीत: