नांदेड (विशेष प्रतिनिधी): २८ जुलै २०२६
राज्य शासनाच्या 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, २०२६' अंतर्गत नांदेड जिल्ह्यातील २ लाख २४ हजार ८४७ शेतकऱ्यांची यादी पोर्टलवर अपलोड करण्यात आली असून, त्यापैकी ९९ हजार ५४ शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले आहेत. मात्र, यातील केवळ १४ हजार शेतकऱ्यांचीच ई-केवायसी (e-KYC) पूर्ण झाली असून ८५ हजार ५४ पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण अद्याप प्रलंबित आहे.
पात्र शेतकऱ्यांनी विलंब न करता तातडीने 'आधार प्रमाणीकरण' आणि 'अग्रीस्टॅक नोंदणी' पूर्ण करून कर्जमाफीचा लाभ घ्यावा, असे कडक व महत्त्वाचे आवाहन नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.
आधार प्रमाणीकरण का आवश्यक आहे?
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत स्पष्ट केले की, योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आधार संलग्नीकरण, प्रमाणीकरण आणि अग्रीस्टॅक नोंदणी ही अनिवार्य अट आहे.
आधार प्रमाणीकरण पूर्ण होताच पात्र शेतकऱ्यांना त्वरित कर्जमाफीचा लाभ मिळेल.
कर्जमुक्त झालेले शेतकरी नव्याने पीककर्ज (Crop Loan) घेण्यास पात्र ठरतील.
शेतकऱ्यांनी काय करावे? (महत्त्वाच्या सूचना):
कुठे जावे?: जवळच्या 'आपले सरकार सेवा केंद्र' किंवा 'सीएससी (CSC) केंद्रावर' जाऊन ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी.
कोणती कागदपत्रे सोबत ठेवावीत?: १. मूळ आधार कार्ड
२. बँकेच्या बचत खात्याचे पासबुक
३. अंगठ्याचे बायोमेट्रिक प्रमाणीकरण करणे आवश्यक.
ई-केवायसी पूर्णपणे मोफत - शुल्क आकारल्यास कारवाई!
जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट निर्देश दिले आहेत की, 'आपले सरकार सेवा केंद्र' किंवा 'सीएससी केंद्र' येथे आधार प्रमाणीकरणासाठी कोणतेही शुल्क लागू नाही. जर कोणत्याही केंद्र चालकाने पैसे मागितल्यास त्याची तक्रार संबंधित प्रशासनाकडे करावी.
अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी आपापल्या बँक शाखा, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था (VKSS) किंवा सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था कार्यालयाशी तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक यांनी केले आहे.
निर्भीड, निष्पक्ष आणि शेतकरी हिताच्या ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा - 'सत्यमेव जयते No 1 NEWS'




कोणत्याही टिप्पण्या नाहीत: