प्रतिनिधी: [शिवानंद पांचाळ नायगांवकर] दि 1 मे
नामस्मरणाने आचरणात खरंच काही बदल होतो का, की फक्त मनाला दिलासा मिळतो, असा प्रश्न अनेकांना पडतो. जर नाम घेतोय तर त्याचा परिणाम आपल्या वागण्यात दिसायला हवा ना. सुरुवातीला कदाचित बाहेरून काही मोठा बदल जाणवत नाही, पण आतून एक सूक्ष्म परिवर्तन सुरू होतं. विचार थोडे संयमी होतात, प्रतिक्रिया देण्याऐवजी थांबून पाहण्याची सवय लागते. राग पटकन येतोच, पण तो तितक्याच वेगाने शांतही होऊ लागतो. मग लक्षात येत की नामस्मरण फक्त जप नाही, ते आपल्या आचरणाला आकार देत आहे.
मग प्रश्न उभा राहतो की जर बदल हळूहळू होत असेल तर आपण तो कसा ओळखायचा. उत्तर सोप आहे, आपल्या दैनंदिन वागण्यात पाहायच... पूर्वी ज्या गोष्टींवर लगेच चिडचिड व्हायची, तिथे आता थोडा संयम दिसतो का. इतरांच्या चुका पाहून मनात द्वेष निर्माण होतो का, की समजूतदारपणा वाढतो. नामस्मरणाचा खरा परिणाम बाहेरच्या जगात नाही, तर आपल्या प्रतिक्रियांमध्ये दिसतो. जिथे मन आधी अस्थिर होत होत, तिथे आता स्थिरतेचा फरक दिसायला लागतो.
पुढे एक महत्त्वाचा प्रश्न येतो, नामस्मरण हे मागेल ते मिळवण्यासाठी करायचं का. जर नाम घेतल तर आपल्या इच्छा पूर्ण होतील का. हा विचार नैसर्गिक आहे, नामस्मरण हे इच्छा पूर्ण करण्यासाठी नाही, तर इच्छांवर नियंत्रण मिळवण्यासाठी आहे. कारण इच्छा पूर्ण झाली तरी नवी इच्छा उभी राहतेच. मग ही धावपळ कधी थांबणार. नामस्मरण आपल्याला त्या धावपळीपासून थोडं दूर उभ राहत, आणि समज देत की खरं समाधान बाहेरच्या गोष्टींमध्ये नाही.
मग प्रश्न पडतो की जर काही मागायचच नसेल तर नामस्मरण का करायचं. कारण नामस्मरण आपल्याला बदलत. ते आपल्याला योग्य विचार देत, योग्य आचरण शिकवत आणि आतून समाधान देत.. जेव्हा मन समाधानी होत, तेव्हा बाहेरच्या गोष्टींची गरज कमी वाटते. आणि आश्चर्य म्हणजे, जेव्हा आपण मागण सोडतो, तेव्हा जे आवश्यक आहे ते आपोआप मिळत जातं.
शेवटी समजून घ्यायचं की नामस्मरण ही व्यवहार बदलणारी शक्ती आहे. ते आपल्याला शांत, संयमी आणि समजूतदार बनवतं. मागण्यासाठी नव्हे, तर स्वतःला घडवण्यासाठी नामस्मरण करायचं. कारण जेव्हा आपण बदलतो, तेव्हा आपल्या आयुष्याचा मार्गही आपोआप बदलतो





कोणत्याही टिप्पण्या नाहीत: