रिपोर्ट: राजेश्वर पोतदार,
धर्माबाद/नांदेड (विशेष प्रतिनिधी): ६ जुलै २०२६ भारतातील लोकशाही अधिक सक्षम, पारदर्शक आणि विश्वासार्ह करण्याच्या उद्देशाने भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नांदेड जिल्ह्यात विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण मोहीम वेगाने सुरू झाली आहे. या मोहिमेअंतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्या माध्यमातून मतदारांचे गणनापत्र (एन्युमरेशन फॉर्म) भरून घेण्याची प्रक्रिया ३० जूनपासून प्रत्यक्ष सुरू करण्यात आली आहे.
या मोहिमेच्या अंमलबजावणीची आणि प्रत्यक्ष कामाची पाहणी करण्यासाठी धर्माबादच्या तहसीलदार मा. सुरेखा स्वामी यांनी स्वतः राजापूर आणि येताळा या गावांना प्रत्यक्ष भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी केवळ पाहणीच केली नाही, तर स्वतः मतदारांचे गणनापत्र भरून ते अधिकृत ॲपवर ऑनलाईन सादर केले. याप्रसंगी त्यांनी सर्व नागरिकांना मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना अचूक माहिती देऊन या राष्ट्रीय कर्तव्यात सक्रिय सहकार्य करण्याचे आवाहन केले.
धर्माबाद तालुक्यातील मोहिमेचे गणित: ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत धर्माबाद तालुक्यातील एकूण ७५ हजार ८३७ मतदारांची घराघरांत जाऊन प्रत्यक्ष पडताळणी करण्यात येणार आहे. या महाअभियानासाठी तालुक्यात ८७ मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ), ०९ बीएलओ पर्यवेक्षक, ०१ मतदार नोंदणी अधिकारी आणि ०४ सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांची विशेष नियुक्ती करण्यात आली आहे.
बीएलओ (BLO) आपल्या घरी आल्यावर नागरिकांनी काय करावे?
१. बीएलओ यांनी आणलेले अंशतः भरलेले गणनापत्र काळजीपूर्वक तपासा.
२. नावात, पत्त्यात किंवा वयात काही दुरुस्त्या असल्यास त्या स्पष्टपणे नोंदवा.
३. पडताळणी झाल्यानंतर गणनापत्राच्या दोन्ही प्रतींवर आपली स्वाक्षरी करा.
४. आपल्या अद्ययावत (नवीन) छायाचित्रासह संबंधित बीएलओकडे गणनापत्र जमा करा.
५. कोणतीही माहिती लपवू नका; लोकशाहीच्या सुदृढीकरणासाठी पूर्णपणे अचूक माहिती द्या.
पूर्वतयारी केल्यास पडताळणी होईल अधिक सोपी:
बीएलओ आपल्या घरी येण्यापूर्वी मतदारांनी voters.eci.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर किंवा ECINet App वर जाऊन स्वतःचा अथवा आपल्या आई-वडिलांचा मतदार तपशील (नाव, मतदारसंघ, भाग क्रमांक, अनुक्रमांक) तपासून ठेवावा, ज्यामुळे बीएलओकडील पडताळणी जलद आणि सुलभ होईल.
ही कागदपत्रे तयार ठेवा (आवश्यकतेनुसार): जर तुमचे किंवा तुमच्या आई-वडिलांचे नाव २००२ च्या विशेष सखोल पुनरीक्षणात नोंदलेले नसेल, तर जन्माचा दाखला, १० वीचे गुणपत्रक/शैक्षणिक प्रमाणपत्र, पासपोर्ट, रहिवासी दाखला, जात प्रमाणपत्र, शासकीय ओळखपत्र, कुटुंब नोंदवही, किंवा १ जुलै १९८७ पूर्वीचे अधिकृत ओळखपत्र/प्रमाणपत्र, तसेच ओळख सिद्ध करणारी इतर आवश्यक शासकीय कागदपत्रे जवळ ठेवावीत.
विशेष पुनरीक्षणाचे अधिकृत वेळापत्रक:
३० जून ते २९ जुलै २०२६: घराघरांत जाऊन माहिती संकलन व प्रत्यक्ष पडताळणी.
५ ऑगस्ट २०२६: प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल.
५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२६: मतदार यादीवरील दावे व हरकती स्वीकारल्या जातीत.
५ ऑगस्ट ते ३ ऑक्टोबर २०२६: प्राप्त दावे-हरकतींची सुनावणी व विल्हेवाट लावणे.
७ ऑक्टोबर २०२६: अंतिम मतदार यादी अधिकृतपणे प्रसिद्ध होणार.
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचे आवाहन:
"अचूक मतदार यादी ही सक्षम लोकशाहीचा पाया आहे. प्रत्येक पात्र मतदाराची योग्य नोंद होणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. त्यामुळे मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना आवश्यक ती अचूक माहिती व कागदपत्रे उपलब्ध करून द्या आणि विशेष सखोल पुनरीक्षण मोहीम यशस्वी करण्यासाठी सक्रिय सहकार्य करा."
निर्भीड, निष्पक्ष आणि वेगवान घडामोडींसाठी पाहत राहा - 'सत्यमेव जयते No 1 NEWS' ( नायगांव/धर्माबाद)




कोणत्याही टिप्पण्या नाहीत: