विशेष रिपोर्ट: राजेश्वर पोतदार,
नांदेड (विशेष प्रतिनिधी): ७ जुलै २०२६
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बेघर आणि गरजू कुटुंबांना हक्काचे छप्पर मिळवून देणाऱ्या 'प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) टप्पा-२' अंतर्गत जिल्हा प्रशासनाने आता एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. योजनेचा तिसरा हप्ता वितरित होऊनही अपूर्ण राहिलेल्या जिल्ह्यातील तब्बल ४० हजार ७५३ घरकुलांचे काम चालू जुलैअखेरीस शंभर टक्के पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. या महाअभियानासाठी सर्व गट विकास अधिकाऱ्यांनी (BDO) आपापल्या तालुक्यात विशेष मोहीम राबवावी, असे स्पष्ट निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) मा. महेश पाटील यांनी दिले आहेत.
जिल्हा परिषदेच्या मुख्य सभागृहात सीईओ महेश पाटील यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील सर्व तालुक्यांची एक उच्चस्तरीय आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीत प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) यासह विविध राज्य पुरस्कृत आवास योजनांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या प्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रभारी प्रकल्प संचालक तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, सर्व प्रमुख विभाग प्रमुख तसेच जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचे गट विकास अधिकारी उपस्थित होते.
अभियंता निहाय (Engineer-wise) लाभार्थी यादी होणार तयार:
बैठकीत तिसरा हप्ता प्राप्त झालेल्या ४० हजार ७५३ अपूर्ण घरकुलांची गती वाढवण्यासाठी प्रत्येक 'ग्रामीण गृहनिर्माण अभियंता' निहाय स्वतंत्र लाभार्थी यादी तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रत्येक घरकुलाचे नियोजनबद्ध पद्धतीने काम पूर्ण करण्यासाठी संबंधित लाभार्थ्याशी ग्रामपंचायत आणि पंचायत समिती स्तरावरून सातत्याने संपर्क ठेवला जाईल. तसेच प्रलंबित कामे वेगाने पूर्ण करण्यासाठी सर्व यंत्रणांनी एकमेकांशी समन्वयाने काम करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.
बैठकीत घेतलेले ६ महत्त्वाचे प्रशासकीय निर्णय:
१. सौर ऊर्जेचा लाभ: पूर्ण झालेल्या सर्व घरकुलांना केंद्र व राज्य सरकारच्या धोरणानुसार सौर ऊर्जेचा (Solar Energy) लाभ मिळवून देण्याबाबत सूचना देण्यात आल्या.
२. राज्य पुरस्कृत योजनांचा निपटारा: रमाई आवास योजना, शबरी आवास योजना आणि मोदी आवास योजनेतील प्रलंबित प्रकरणांचा तात्काळ निपटारा करणे.
३. मनरेगाशी समन्वय: घरकुलांची कामे वेगाने पूर्ण करण्यासाठी मनरेगा (MGNREGA) योजनेतून मजुरीचा व इतर आवश्यक समन्वय साधणे.
४. आवास प्लस सर्वे २०२४: आवास प्लस सर्वे २०२४ मधील प्रलंबित आणि पात्र बाबी तातडीने निकाली काढणे.
५. पीएम जनमन योजना: विशेष मागास प्रवर्गासाठीच्या 'पीएम जनमन' योजनेतील घरकुलांच्या प्रलंबित कामांना गती देणे.
६. वेळेत निधी वितरण: सर्व पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना पुढील हप्त्यांचा निधी विनाविलंब आणि वेळेत वितरित करण्याची दक्षता घेणे.
📢 'सत्यमेव जयते'चे विश्लेषण: घरकुलांच्या कामांना मिळणार रॉकेट गती!
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांनी घेतलेल्या या आक्रमक भूमिकेमुळे आणि निश्चित केलेल्या 'जुलै अखेर' या डेडलाईनमुळे प्रशासकीय यंत्रणा आता कामाला लागली आहे. यामुळे जिल्ह्यातील हजारो कुटुंबांचे स्वतःच्या हक्काच्या घरात राहण्याचे स्वप्न येत्या काही दिवसांतच साकार होणार असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.
निर्भीड, निष्पक्ष आणि वेगवान ग्रामीण भागातील घडामोडींसाठी पाहत राहा - 'सत्यमेव जयते No 1 NEWS'
( नांदेड)




कोणत्याही टिप्पण्या नाहीत: