नायगाव (विशेष प्रतिनिधी): २७ सप्टेंबर २०२६
नायगाव तालुक्यातील पळसगाव येथे आज रविवार, दि. २७ सप्टेंबर रोजी नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. अतुल सावे यांच्या समवेत स्थानिक आमदार राजेश पवार यांनी परिसरातील दुष्काळी परिस्थितीची प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी केली. पावसातील मोठा खंड, त्यामुळे पिकांचे झालेले प्रचंड नुकसान आणि शेतकरी बांधवांसमोरील अडचणींची पाहणी करून संपूर्ण परिस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या वेळी मान्यवरांनी उपस्थित शेतकरी बांधवांशी थेट संवाद साधून त्यांच्या व्यथा व समस्या जाणून घेतल्या.
पावसाअभावी खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या या सर्व समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवून तातडीने आवश्यक ती मदत व उपाययोजना करण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात येईल, असा ठाम विश्वास आमदार राजेश पवार यांनी या वेळी शेतकऱ्यांना दिला.
राज्याचे संवेदनशील नेतृत्व आणि महायुती सरकार हे संकटकाळात बळीराजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, या गंभीर संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी शासनाकडून आवश्यक ती सर्व मदत केली जाईल, असे या पाहणी दौऱ्यादरम्यान स्पष्ट करण्यात आले.
या पाहणी दौऱ्याप्रसंगी नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे यांच्यासह महसूल व कृषी विभागाचे संबंधित अधिकारी आणि परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निर्भीड, निष्पक्ष आणि वेगवान बातम्यांसाठी पाहत राहा - 'सत्यमेव जयते No 1 NEWS'
(रिपोर्ट: राजेश्वर पोतदार, नायगाव)




कोणत्याही टिप्पण्या नाहीत: