.
नायगांव (विशेष प्रतिनिधी - राजेश्वर पोतदार):
राज्यातील दुष्काळी परिस्थितीत गरजू रुग्णांना वेळेत उपचार आणि आर्थिक मदत मिळावी, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष' आता थेट तालुका स्तरावर स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे, अशी माहिती नायगांव विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. राजेश संभाजीराव पवार यांनी दिली आहे. सामान्य प्रशासन विभागाने ६ नोव्हेंबर २०२६ रोजी याबाबतचा शासन निर्णय जारी केला असून, खरीप हंगाम २०२६ मध्ये ट्रिगर-१ अंतर्गत दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यांत हा कक्ष कार्यान्वित होणार आहे.
आमदार राजेश पवार यांनी दिलेली महत्त्वाची माहिती:
पंचायत समितीत स्वतंत्र कक्ष: संबंधित तालुक्यातील पंचायत समिती कार्यालयात हा कक्ष सुरू होणार असून, जिल्हाधिकारी या ठिकाणी एका स्वतंत्र वैद्यकीय अधिकाऱ्याची (कक्ष प्रमुख) व सहाय्यक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करतील.
योजनांचा प्राधान्यक्रम: रुग्णांना पात्रतेनुसार आधी आयुष्मान भारत, महात्मा फुले जन आरोग्य योजना, कामगार योजना किंवा धर्मादाय रुग्णालयांतून उपचार दिले जातील. या योजनांसाठी अपात्र ठरणाऱ्या रुग्णांचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने मुख्यमंत्री निधीतून मंजुरीसाठी पाठवले जातील.
दोन स्तरांवर समन्वय समित्या: तालुकास्तरीय समितीचे अध्यक्ष स्थानिक आमदार (सहअध्यक्ष - उपविभागीय अधिकारी) असतील, तर जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष पालकमंत्री (सहअध्यक्ष - जिल्हाधिकारी) राहतील. या समित्यांची महिन्यातून किमान दोनदा बैठक घेणे बंधनकारक आहे.
दुर्गम भागात आरोग्य शिबिरे: आशा सेविका व आरोग्य केंद्रांमार्फत गरजू रुग्णांचा शोध घेतला जाईल. तसेच खासगी व शासकीय तज्ज्ञ डॉक्टरांच्या मदतीने दुर्गम भागात आरोग्य शिबिरे आणि फिरती वैद्यकीय पथके राबवून महिला, बालके व ज्येष्ठ नागरिकांवर विशेष लक्ष दिले जाईल.
दैनंदिन अहवाल: तालुका कक्ष दैनंदिन कामाचा अहवाल जिल्हा कक्षाकडे आणि जिल्हा कक्ष मंत्रालयात सादर करेल.
आर्थिक अडचणीमुळे कोणताही गरजू रुग्ण उपचारांपासून वंचित राहू नये, या उद्देशाने घेतलेल्या या लोकाभिमुख निर्णयाबद्दल आमदार राजेश पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानत गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
निर्भीड, निष्पक्ष आणि लोकाभिमुख पत्रकारिता – 'सत्यमेव जयते No 1 NEWS'




कोणत्याही टिप्पण्या नाहीत: